कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथे शुक्रवारी (दि. ३) लसीकरणाच्या श्रेयवादावरून झालेल्या हाणामारीत मारहाण झालेल्या पार्श्वभूमीवर कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड व त्यांचे पती भाजप कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ व प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.
सदर घटना घडल्यानंतर माझा व्हिडिओ तोडूनमोडून व्हायरल करण्यात आला. ग्रामपंचायतीत लोकोपयोगी काम करीत असताना मला व माझ्या समर्थकांना राष्ट्रवादीच्या काही सदस्यांकडून मानसिक त्रास दिला जात आहे. एक महिला म्हणून न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाकडून मला न्याय मिळेलच. मी माझ्या मागण्या मांडण्यासाठी फडणवीस यांच्याकडे आले होते असे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळावे यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा. मला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी व्हावी. मारहाणीची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद का केले, याचे उत्तर मिळावे. तसेच सर्वसामान्यांसाठी ते पुन्हा सुरू करावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
----
फोटो क्रमांक : ०९कदमवाक वस्ती देवेंद्र फडणवीस
फोटो - मागण्यांसंदर्भात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड व त्याचे पती भाजप कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, केशव उपाध्ये उपस्थित होते.