जुलै १९३२ मध्ये महात्मा गांधी हरिजनमुक्ती प्रचारासाठी म्हणून पुण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन पुणे नगरपालिकेने त्यांना मानपत्र देण्याचे ठरवले. त्याला विरोध करण्यात आला. काँग्रेसचे पुण्यातील पुढारी काकासाहेब गाडगीळ यांनी विरोधकांशी बौलून कसाबसा हा विरोध शमवला. मानपत्राचा ठराव मंजूर झाला. ९ जुुलैला गांधीजी पुण्यात आले. सोमवार ११ जुलैला पालिकेच्या त्यावेळच्या विश्रामबागवाडा येथील कार्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सभागृहात गर्दी झाली होती. बरोबर ६ वाजून २० मिनिटांनी एक गाडी कार्यालयासमोर आली. तिच्यातील व्यक्ती गाडीतून उतरताच कोणीतरी वरून एक बॉम्ब फेकला. सुदैवाने ती गाडी पुण्यातील त्यावेळचे एक नेते भोपटकर यांची होती. वाकडेवाडी फाट्यावर रेल्वेफाटक बंद असल्यामुळे गांधीजींच्या गाडीला थोडा विलंब होणार होता. भोपटकर त्यात जखमी झाले. गाडगीळ यांनी खाली झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती वर बसलेल्या गर्दीत जाऊ दिली नाही. पंधरा मिनिटांतच गांधीजींची गाडी आली. गाडगीळ यांनी पोलिसांना सांगून त्यांच्याभोवती कडे केले व त्यांना सभागृहात नेले. जाताना गांधीजींना काय झाले, याची माहिती दिली. ते समजल्यानंतरही गांधीजींनी पंधरा मिनिटे शांतपणे भाषण केले. मानपत्राचा करंडक जास्तीत जास्त पैशांना विकत घ्या, काकांना त्यात कमिशन मिळेल, असा विनोदही केली. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून रवाना होताना त्यांनी काकासाहेबांना तसेच पोलिसांनाही ‘हल्लेखोर सापडले तर मी त्यांना क्षमा केली आहे,’ असा माझा निरोप द्या, असे सांगितले.
..........
संदर्भ- पथिक, भाग १ प्रकरण ११, पान क्रमांक २८६ लेखक : काकासाहेब गाडगीळ