लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या लाऊड स्पीकर बंद करून जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर १५ ते २० जणांच्या जमावाने दगडफेक करून हल्ला केल्याचा प्रकार पाषाण परिसरातील लमाणतांडा येथे घडला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली.
ढाकू भिकू मेघावत (वय ३८), रामा उर्फ प्रमोद हनुमंत मेघावत (वय २४), हिरामण भिमा राठोड (वय २९), लक्ष्मण भिमा राठोड (वय २५), संजय वालिया धनावत (वय २७, सर्व रा. संजय गांधी वसाहत, लमाणतांडा, पाषाण) आणि व्यंकटेश मोतीराम खेतावत (वय २०, रा. नांदे मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लमाणतांडा येथील जगदंबा चौकात सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास स्पीकर सुरु असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याची वन मोबाईल व इतर पोलीस त्याठिकाणी गेले. त्यावेळी मोठ्याने स्पीकरचा आवाज येत होता. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींना स्पीकर बंद करण्यास सांगितले. मात्र सांगून देखील स्पीकर बंद न केल्यामुळे पोलिसांनी जप्तीची कारवाई करत स्पीकर काढण्यास सुरूवात केली. दरम्यान १५ ते २० जणांच्या जमावाने सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण यांच्यासह पोलिसांना धक्काबुक्की सुरू केली. पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. पोलिसांनी तरीही स्पीकर जप्त केला. त्यावेळी तेथील नागरिकांनी यांना आज सोडायचे नाही, अशी चिथावणी देऊन पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलिस कर्मचारी बोरसे यांना दगड लागल्यामुळे ते जखमी झाले. तसेच, या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ६ जणांस अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी अधिक तपास करत आहेत.