लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणावरून सरकारी नोकरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षात ६१ सरकारी नोकरांवर हल्ले झाले. त्यातील ५५ घटना उघडकीस आले असून त्यात ८६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पोलीस कर्मचा- ना लोकांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले आहेत.
गेल्या वर्षभरातील जवळपास १० महिन्यात लॉकडाऊन आणि त्यानंतर मास्कची कारवाई यामुळे पोलिसांवर मोठी जबाबदारी होती. लोकांचा रोष पत्करून कारवाई करण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यातून अनेकदा वादविवाद होऊन पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या. लॉकडाऊन संपल्यावर रस्त्यावरील वाहतूक वाढली. वाहतूक नियमभंग केल्याने रस्त्यात अडविल्याने अनेक वाहतूक पोलिसांना लोकांच्या लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले.
पोलिसापाठोपाठ महावितरणच्या कर्मचा-यांवर अधिक हल्ले झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना जास्तीची बिले आली. त्यातून लोकांनी महावितरण कार्यालयावर जाऊन आंदोलने केली. महावितरणच्या कार्यालयातील कर्मचा-यांशी लोकांची वादावादी झाली. त्यातून काही ठिकाणी कर्मचा-यांना धक्काबुक्कीच्या घटना घडल्या. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शिरून तेथील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना गेल्या वर्षी काही ठिकाणी घडल्या.
...
सरकारी कर्मचा-यांवरील हल्ल्यात सर्वाधिक लक्ष्य ठरले ते पोलीस. रस्त्यावर काम करणा-या पोलिसांना लॉकडाऊनमध्ये संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यातूनच पोलीस आणि नागरिक यांच्यात वादावादी झाली. ४३ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांवर गेल्या वर्षभरात हल्ले झाले. त्यातील ३७ घटनात आरोपी निष्पन्न झाले असून ६३ जणांना अटक करण्यात आली आहे.
.............
३५३ कलम
सरकारी कर्मचा-यांना त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याबद्दल ३५३ कलमानुसार कारवाई केली जाते. त्यात आरोपीला कमीतकमी २ वर्षे शिक्षा किवा दंड किंवा दोन्हीही असे प्रावधान आहे.
हल्ले एकूण दाखल, उघड, एकूण अटक आरोपी
सरकारी नोकरांवरील हल्ले ६१ ५५ ८६
पोलीस दलावरील हल्ले ४३ ३७ ६३
इतर विभागावरील हल्ले १८ १८ २३