धनकवडी (पुणे) : पोलिसांनी कोयता गॅंगला रोखण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक कारवाया करूनही गुन्हेगार त्याला भीक घालत नसल्याचे चित्र पुन्हा दिसले. सोमवारी सायंकाळी धनकवडीत अवघ्या तासा-दोन तासांच्या अंतरात तीन ठिकाणी कोयत्याने वार करत दहशत माजविण्यात आली. यातील एका प्रकरणात खुनाचा प्रयत्न, तर दुसऱ्या प्रकरणात मारहाणीचा गुन्हा सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला असून, तिसऱ्या प्रकरणात मात्र अद्याप तक्रार दाखल झाली नाही.
रोहित हवालदार (वय २७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित यांचा भाऊ रोहन हवालदार (२४) हा धनकवडी येथील अमृततुल्य येथे चहा पित थांबला होता. तेव्हा अकरा जणांच्या टोळक्याने रोहनच्या डोक्यात, पाठीवर आणि हाता-पायावर बांबूने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याने हॉटेलमधील कामगार अजित कुलाल याच्या डोक्यात मारहाण केली आणि हॉटेलची तोडफोड करत दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी अभिषेक थोरात (२२, रा. राजमुद्रा सोसायटी, धनकवडी) हा भाऊ ओंकार थोरात आणि मित्र अमर चौधरी यांच्यासह राजमुद्रा सोसायटीसमोर ओंकार पार्क येथे गप्पा मारत बसले असताना सात ते आठजणांच्या टोळक्यांनी ‘हाच तो, हाच तो’ म्हणत कोयता उगारून मारहाण केली. यात ओंकार आणि अमर दोघेही जखमी झाले आहेत.
तिसरी घटना क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौकात घडली. यामध्येही कट्ट्यावर बसलेल्या काही तरुणांना मारहाण करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी या प्रकरणी मात्र अद्यापही तक्रार दाखल झाली नाही.