इंदापूर : इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न पोहोचू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे. अॅट्रॉसिटी अॅक्टसंदर्भात सरकारने मराठा व दलित वर्गातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. समाजात फूट पाडण्याचे कारस्थान भाजपा सरकारने करू नये, असे मत धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत. मात्र, हा मराठा समाजाची बोळवण करण्याचाच एक भाग आहे, असा आपला स्पष्ट दावा आहे, असे सांगून हेमंत पाटील म्हणाले, की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपण १ आॅगस्ट रोजी विधान भवनावर मोर्चा काढला होता, त्या वेळी याच चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे चर्चेच्या बैठकीकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला असता, आपल्या भूमिकेपासून घूमजाव केले. भाजपा सरकारने धनगर समाजाची जी अवस्था केली, तशीच अवस्था मराठा समाजाची होईल. आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रसंगी महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी सुनील दडस, सोमनाथ टकले, बळीराज टकले, हरिश्चंद्र धायगुडे, धनाजी दडस हे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून फूट पाडण्याचा प्रयत्न
By admin | Published: October 11, 2016 2:05 AM