जेजुरी (पुणे) : जमिनीच्या वादातून काकाने पुतण्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जेजुरीपोलिसात दाखल झाला आहे. हा प्रकार पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीकच्या वाघदरवाडी येथे घडला.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली अशी की, वाघदरवाडी येथील फिर्यादी शारदा नानासाहेब भुजबळ यांच्या जमीन गट नंबर २८५३ मध्ये त्यांचे धाकटे दीर आरोपी भास्कर त्रिबक भुजबळ यांनी अतिक्रमण करून ऊस लागवड केली होती. याबाबत लागवड झाल्यापासूनच या दोघांत धुसफूस सुरू होती. काल फिर्यादीच्या परस्पर आरोपीने या जमिनीत ऊस तोड बोलावली होती.
परस्पर ऊसतोड सुरू केल्याने ती थांबवण्यासाठी फिर्यादी शारदा भुजबळ आणि त्यांचा मुलगा स्वप्नील नानासो भुजबळ हे तेथे गेले होते. यावरून वादावादी सुरू झाली. यात माझ्या कर्जाचे पैसे द्या मग ऊस तोड थांबवा असे म्हणत आरोपी भास्कर भुजबळ यांनी या मायलेकांना शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. वादावादी वाढल्याने आरोपीने पुतण्या स्वप्नील याच्या अंगावर रॉकेल ओतून हातातील लाकडी पेटत्या टेंब्याने पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी शारदा व त्यांचा मुलगा स्वप्नील जखमी झाले असून जेजुरी पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३२४, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीस अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.