लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय नागरी विकास मंत्रालयातील सचिव असल्याचे सांगून मोबाईलवरील ट्रू कॉलरवर त्यांचे नाव ठेवून पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकारणचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे आणि महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिहाडे यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून मेट्रोच्या कंत्राटदारांना लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी दिवसे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तर बिहाडे यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गौतम बिहाडे हे त्यांच्या महाराष्ट्र मेट्रो कार्यालयात असताना २६ डिसेंबर रोजी त्यांना एक फोन आला. “मी दुर्गा शंकर मिश्रा सचिव गृहनिर्माण मंत्रालय व नागरी आहे. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांचा संपर्क क्रमांक देऊन त्यांना माझ्याशी बोलायला सांगा व त्यांचा नंबर मला द्या,” असे या फोनवरून बिहाडे यांना सांगण्यात आले. हे कंत्राटदार आपल्या नाही तर रवीकुमार यांच्या अधिपत्याखाली काम करीत असल्याचे बिहाडे यांनी सांगितले. बिहाडे यांच्या मोबाईलवरील ट्रु कॉलरवर ‘दुर्गा मिश्रा’ असे नाव दिसत होते. पण इतका मोठा अधिकारी आपल्याला कसा फोन करेल, अशी शंका आल्याने त्यांनी ही बाब व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना सांगितली. तेव्हा त्यांनी दुर्गा मिश्रा यांचा हा नेहमीचा नंबर दिसत नाही. त्यांचे व्हॉटसॲप प्रोफाईल चेक केल्यावर सेक्रेटरी दुर्गा मिश्रा व फोन नंबर कोलकत्ता असे दिसत होते.
त्यानंतर त्यांना या नंबरवरून दोन-तीनदा कॉल आले. तेव्हा दीक्षित यांच्या सांगण्यावरुन त्यांनी ते व्हॉईस रेकाॅर्ड केले. त्यावर दीक्षित यांनी हा आवाज मिश्रा यांचा नसल्याचे सांगितले. मिश्रा यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार कळविल्यावर त्यांनी तक्रार देण्यास सांगितले. त्यावरुन आरोपी हा मेट्रोच्या कंत्राटदारांना ठकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने दुर्गा शंकर मिश्रा यांच्या नावाचा वापर करुन त्यांचा फोटो व्हॉटसॲप प्रोफाईलवर ठेवून ट्रू कॉलरवर त्यांच्या नावाची नोंद करुन ठकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
याचप्रमाणे पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनाही वारंवार फोन करुन त्याने फसवण्याचा प्रयत्न केला. याबाबत दिवसे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दिवसे यांनी सांगितले की, नंबरची खात्री केल्यावर तो बनावट असल्याचे लक्षात आले. गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने संशयिताने वारंवार फोन केल्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
चौकट
‘ट्रू कॉलर’ही खराच असतो असे नाही
“एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला की आपण ट्रू कॉलरवर त्याचे नाव पाहतो. त्याच्याकडून फोन आल्याचे खरे मानतो. पण प्रत्येक वेळी ट्रु कॉलरवरील आयडेंटिटी खरी असतेच असे नाही. जेव्हा एखादे नवीन सीमकार्ड घेतले जाते व ते मोबाईलमध्ये टाकून तो नंबर ज्या नावाने सेव्ह केला जातो. तेच नाव ट्रु कॉलरवर सेव्ह होते व नंतर ज्यांना त्या नंबरवरुन कॉल जातो, त्यांना त्या नावाच्या व्यक्तीने फोन केला असे वाटते. त्यामुळे फसवणुक करण्यासाठी ट्रु कॉलरवर बनावट नावाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ट्रु कॉलरवरील ओळख ही नेहमीच खरी असते असे नाही. लोकांनी खात्री करुनच व्यवहार करावा.”
-मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक.