लोणी काळभोर : शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून शेतकऱ्यांना सोप्या आणि सुलभ पद्धतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पिकांची माहिती मिळवून देणे, यावर भर देण्यात येत आहे. सांघिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते त्यामुळे या नवीन तंत्रज्ञाचा सर्वांनी वापर करावा असे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.
महसूल व कृषी विभागाच्या वतीने कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री गार्डन मंगल कार्यालयात शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी डेमो प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार पवार बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, नगरसेवक गणेश ढोरे, मंडल अधिकारी गौरी तेलंग ( थेऊर ), अशोक शिंदे ( वाघोली ), नुरजहॉ सय्यद ( ऊरूळी कांचन ), तलाठी दादासाहेब झंजे ( लोणी काळभोर ), सविता काळे ( कुंजीरवाडी ), सुधीर जायभाय ( ऊरूळी कांचन ), प्रदीप जवळकर ( शिंदवणे ), योगिराज कनिचे ( मांजरी बुद्रुक ), राजेश दिवटे ( कोलवडी ) आदी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले की, आज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद होतो आहे.
शेतकऱ्यांना नवीन गोष्टी आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांचे जीवन सोपे आणि सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठीच या स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी दिली. सूत्रसंचलन थेऊर मंडल अधिकारी गौरी तेलंग यांनी केले तर आभार अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी मानले.