जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नारायणगाव, वारुळवाडी ही शहरे हॉटस्पॉट झाली आहेत. वाढता प्रादुर्भाव पाहता या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक तथा माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासंदर्भात आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार ग्रामपंचायत वारूळवाडी येथील कोरोना दक्षता समितीच्या १५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीनुसार वारूळवाडी ग्रामपंचायतीने येथील रा. प. सबनीस विद्यामंदिरातील मुख्याध्यापक यांना त्यांच्या संस्थेतील शिक्षक यांची यादी तसेच शिक्षकांना १५ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात द्याव्यात अशा आशयाचे पत्र दिले होते. या पत्रावर अंमलबजावणी ऐवजी शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उलट ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देऊन आम्ही सर्वेक्षण करण्यास तयार आहोत. मात्र आमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी व मुले यांची कोरोना महामारी संदर्भात सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारावी व ग्रामपंचायतीने यासंदर्भात लेखी पत्र द्यावे, अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे. या पत्रामुळे कोरोनाचे सर्वेक्षण कसे करायचे? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला प्रश्न पडला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रा. प. सबनीस विद्यामंदिर या शाळेकडून मिळालेल्या पत्रानंतर वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामविकास अधिकारी गवारी यांनी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून शाळेच्या पत्राची माहिती सादर केली आहे .
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती काळात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा अवमान कोणी शिक्षक करत असेल तर त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच जिल्हा परिषद सेवा नियम १६७ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रा. प. सबनीस विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य रवींद्र वाघोले म्हणाले की, शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडे केलेला पत्रव्यवहार मध्ये काही चुकीचे वाटत नाही . मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दिनांक १६ एप्रिलचे पत्र आहे. या पत्रानुसार सर्व शिक्षकांची यादी , मस्टरच्या झेरॉक्स ग्रामपंचायतीला सुपूर्त करण्यात आलेल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी यांचे १६ एप्रिलच्या पत्रानुसार सर्व शिक्षकांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी दिनांक १७ एप्रिल रोजी संपर्क ही साधलेला आहे. शिक्षकांनी त्यांच्या शंका निरसनासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला पत्र दिलेले आहे .त्या पत्रात सर्वेक्षण करणार असा उल्लेख केलेला आहे . शिक्षकांची नावे देण्यामध्ये आमचे कार्यालयाकडून कोणताही विलंब झालेला नाही. शाळेतील शिक्षकांनी ग्रामपंचायतीमध्ये येण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले की, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी , गटविकास अधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे करिता शाळेला पत्र दिले होते. सर्वेक्षण करिता शिक्षकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे असताना शाळेकडून झालेला पत्रव्यवहार हा चुकीचा आहे. काही विशिष्ट व्यक्तींकडून आकसापोटी किंवा जाणीवपूर्वक असा पत्रव्यवहार केला असावा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांनी कोरोना सर्वे आदेश दिलेले असताना आदेशाचा अवमान करून ग्रामपंचायत प्रशासनाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.