पुणे : पूर्ववैमनस्यातून कोयता, पालघन आणि लाकडी दांडक्याने डोके, हातपाय आणि अंगावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एकाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला (दि. ७) जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे यांनी दिला आहे. ही घटना ४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कर्वेनगर येथे घडली.
अमोल अनिल मोरे (वय २६, रा. बेनकरवस्ती, धायरी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात आणखी तिघांवर गुन्हा दाखल असून, त्या तिघांना जामीन झाला आहे. एका अल्पवयीन मुलाचा सहभागही निष्पन्न झाला आहे. हर्षल सुनील कंधारे (वय २५, रा. कर्वेनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ संकेत (वय २३) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अमोल याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यासाठी, तसेच गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. तो कोठे होता, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
-------------------------------