लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोटे यांच्या लाकडाच्या वखारीवर कामाला यायचे नाही, असे सांगूनही आलेल्या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे.
अमर शिवाजी रेणुसे (वय ३५, रा. कात्रज नवीन वसाहत, कात्रज), गणेश पांडुरंग गालफाडे (वय ३५, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अमर रेणुसे हा पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी राजू ज्ञानेश्वर गवळी (वय ३६, रा. दांडेकर पूल) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गवळी हे लाकूड व गवरी विक्रीचे काम करतात. कात्रज येथील दिनकर स्मशानभूमीत ते १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता काम करीत असताना अमर व गणेश तेथे आले. त्यांनी गवळी यांना आवाज देऊन गॅसदाहिनीत बोलावले. ते तेथे गेल्यावर तुला आम्ही पोटेच्या लाकडाच्या वखारीवर कामाला यायचे नाही, असे सांगून देखील तू का आलास, असे म्हणून दोघांनी लाकडी दांडक्यानी गवळी यांच्या दोन्ही पायावर, पोटावर, छातीवर मारून जखमी केले. तसेच अवघड जागेवर लाथ मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अटक केली.