लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : शहरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालून सोन्या-चांदीचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. शहरातील चार दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे कृत्य कैद झाले आहे. चोरीच्या घटनेने मंचर शहरात खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बाजारपेठेत श्रीराम ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरटे हा प्रयत्न करत असताना दुकानाच्या सुरक्षेसाठी असणारे सायरन आणि मोबाइलची रिंग वाजली. त्या आवाजाने चोरट्यांनी धूम ठोकली. येथे असलेल्या सीसीटीव्ही वरील फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. यावेळी दोन चोरटे होते. त्यांनी सेंट्रल बँकेजवळ त्यांची गाडी लावून ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटण्यचा प्रयत्न केला. एका चोरट्याने तोंडाला मास्क तर दुसऱ्याने तोंडाला रूमाल बांधल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आल्याचे दुकानमालक गोरक्षनाथ आनंद कदम यांनी सांगितले. केवळ सायरन वाजल्याने दुकानातील लाखो रुपयांचा ऐवज सुरक्षित राहण्यास मदत झाल्याचे नीलेश कदम यांनी सांगितले.मंचर शहरात इतर ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चार दुकानांचे शटर उचकटून पस्तीस हजार रोख व चिल्लर त्यांनी चोरून नेली. विकास थिएटरच्या आवारात मोरे ब्रदर्स यांचे खत, औषधाचे दुकान आहे. या दुकानांचे शटर उचकटून गल्ल्यात असणारी दहा हजार रुपयांची रोकड आणि चिल्लर चोरीला गेल्याचे दुकानमालक महेश मोरे यांनी सांगितले. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे चोरी करताना दिसून आले. मोरे ब्रदर्स या दुकानासमोरील राजेंद्र प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील अंदाजे पंधराशे रुपये चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. श्रीकांत किराणा स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून रोकड व चिल्लर असे एकूण वीस हजार रुपये चोरीला गेल्याचे दुकान मालक श्रीकांत बाबूराव महाजन यांनी सांगितले.
मंचर शहरात दुकान लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 26, 2017 3:38 AM