पुणे : रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारात तब्बल ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली.
निकीता गोपाळ ताले (वय २५, रा. एमआयडीसी, भोसरी), राहुल बाळासाहेब वाळुंज (वय २७), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय २०, दोघे रा. अमित अपार्टमेंट, चाफेकर चौक, चिंचवड), प्रतीक गजानन भोर (वय 26, अनुसूया पार्क,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना खडकी बसस्टॉपकडे जाणार्या रस्त्यावर काही जण रेमडेसिविर इंजेक्शन ३७ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, यांनी सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. बनावट ग्राहक तयार करुन गुरुद्वारा परिसरात निकीता ताले हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून १ इंजेक्शन जप्त केले. औषध निरीक्षक जयश्री सवदती यांच्या मदत घेण्यात आली. तिच्याकडे केलेल्या चौकशी या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. वाळुंज हे दोघे भाऊ असून रोहन हा शिक्षण घेत आहे.
निकीता ताले व प्रतिक भोर यांचा कार्ड प्रिटींगचा व्यवसाय आहे. निकीताला राहुल याने हे इंजेक्शन आणून दिले होते.
शहर पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारात विकण्याचा प्रयत्न करणार्या ११ जणांना अटक केली आहे.रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराची माहिती कळवारेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणार्या विरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची पथके कार्यान्वित केलेली आहेत. रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी त्वरीत शहर पोलिसांशी संपर्क साधावा.अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर