पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 01:16 PM2023-08-12T13:16:10+5:302023-08-12T13:26:03+5:30
केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
पुणे : अडचणींवर मात करत चांदणी चौकातील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. आधी हजारो कोटी रुपये खर्च करूनही इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नव्हता. आता पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पुण्यात ४० हजार कोटींचे कामे पूर्ण केली जाणार आहेत, असं आश्वासन वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते पुण्यात चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना एकदा विनंती आहे की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पाहावे. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच पुण्याला लवकर प्रदुषममुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हायड्रोजन भविष्य आहे-
पुणे आता अधिक वाढवू नका. हे शहर आता प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला राहायला यायचो, तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. पण आता शहरातील प्रदुषणात वाढ झाली आहे. मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे, असंही गडकरी म्हणाले. पुण्याला पेट्रोल- डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदुषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आज पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पुणे विमानतळाचे लवकर जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या विकासात वेगाने भर पडणार आहे. पुरंदरच्या विमानतळासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या पूर्ण आहेत. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट हा एकमेव पर्याय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे.