पुणे : सिंघू बॉर्डर (पंजाब) येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ बालगंधर्व चौकातील झाशी राणी पुतळा या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.
निमित्त हाेते, शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात सोमवारी (दि. २६) आयाेजित केलेल्या युवक काँग्रेसच्या मेळावा आणि बैठकीचे. यादरम्यान कार्यकर्ते काही कृत्य करणार असल्याची माहिती डेक्कन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार बालगंधर्व चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
संध्याकाळी सातच्या सुमारास घोले रोड येथून युवक काँग्रेसचे आठ ते दहा कार्यकर्ते झाशी राणी पुतळा चौकात आले, मात्र त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. ऋषिकेश ऊर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधराम आणि राहुल दुर्योधन शिरसाट या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन डेक्कन पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.