किरण शिंदे
पुणे : महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दोन गटांची एकमेकांवर टीकाटिपणी सुरु असल्याचे दिसत आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात आरोपी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली. या घटनेत पार्किंग मध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.