अश्विनी जाधव केदारी
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात सलून चालकाने सलून मध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. भाजप कार्यकर्त्यांनी सलून चालकाला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण केली, तर दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असून यात आर्थिक वाद असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या सलून चालकाने जबरदस्तीने धर्मांतरण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय, इतकच नाही तर या प्रकरणाला लव जिहादचा रंग देत सलून चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील कोथरूड परिसरात अर्ष नावाचे सलून आहे, या सलून चालकाने सलून मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला सांगितला. असा आरोप भाजप कार्यकर्त्या असलेल्या उज्वला गौड यांनी केलाय, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच, सलून चालकासह त्याचा साथीदार आणि भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमले, आणि याचवेळी चालकाला आणि त्याच्या साथीदाराला भाजपाच्या उज्वला गौड आणि यांच्या कार्यकर्त्यांनी आज मारहाण केली.
भाजपच्या उज्वला गौड यांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले, यातील तरुणी आणि संबंधित सलून चालक यांच्यामध्ये आर्थिक वाद होता आणि यामुळेच त्यांच्यात अनेक वेळा वादावादी सुद्धा झाली होती. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात सलून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या बाजूला भाजपाच्या उज्वला गौड यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान जबरदस्तीने धर्मांतरण केल्याचा दाव्याचे कुठलेही पुरावे पोलिसांना अद्याप मिळाले नाहीत. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे जबरदस्तीचे धर्मांतरण असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळ वळण मिळालं आहे.