पुणे : रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादात पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून जीवे मारण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केला.
याप्रकरणी पोलीस नाईक पी. आर. मोटे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कालीदास खांदवे (वय ३५, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव), माउली खांदवे (रा. लोहगाव) व त्यांच्या तीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लोहगावमधील जगद्गुरू पेट्रोलपंपाजवळ रविवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी मोटे हे कारमधून प्रतीक मटण शॉप येथे मटण घेण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथे कार पार्क केली तेव्हा कालीदास खांदवे याने त्यांना गाडी बाजूला घे, असे सांगितले. त्यावर मोटे यांनी मी पोलीस आहे. थांब जरा असे सांगितले. त्यानंतर दोघांनी त्यांच्याकडील दुचाकी आडवी लावून मोटे यांच्याबरोबर हुज्जत घातली. खांदवे याने फोन करून साथीदारांना बोलावले. मोटे यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून गंभीर जखमी केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाने करीत आहेत.