बारामती (पुणे) : बारामतीतील पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपाच्या पेट्रोल पंपाची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या पंप व्यवस्थापकाला अडवून लुटीचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बारामती शहरात सोमवारी (दि. ७) भरदिवसा १२ च्या दरम्यान घडला. पिस्तूल रोखत त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी केला. या घटनेत पंपाचे व्यवस्थापक मयुर शिंदे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले. शिंदे यांनी धाडसाने विरोध केल्याने दोघा चोरट्यांवर ही रोकड न घेताच तेथून पसार होण्याची वेळ आली.
सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील रक्कम घेत ती भरण्यासाठी ते दुचाकीवरून शहरातील बँकेच्या दिशेने निघाले. यावेळी अचानक स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्याकडील रक्कम असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवस्थापक शिंदे यांनी ही बॅग धाडसाने पोटाखाली दाबून ठेवली. बॅग हाती मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले. तरीही शिंदे यांनी पैशांची सोडली नाही. चोरट्यांना बॅग मिळू नये, यासाठी धोका पत्करत विरोध केला. यावेळी चोरट्यांनी त्यांना पिस्तुल रोखत धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील पैशांची बॅग शिंदे यांनी सोडली नाही. त्यामुळे त्यांना पिस्तुलाच्या मुठीने मारहाण करण्यात आली. त्यात शिंदे गंभीर जखमी झाले. त्यावेळी येथील मोहिते वस्तीवरील मुले धावून आली. यावेळी दुचाकीवरील दोघे आणि पुढे दुचाकीवर थांबलेले दोघेजण पसार झाले.
यावेळी उपस्थित युवकांनी दिपक गुजर यांना संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. दिपक गुजर यांनी तातडीने शिंदे यांना उपचारासाठी येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना पाच ते सहा टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे. यासंबंधी गुजर म्हणाले, शनिवार आणि रविवार दोन दिवस बँक बंद असल्याने आजच्या भरण्याबाबत संबंधित व्यक्तीला माहिती असण्याची शक्यता आहे. पाळत ठेऊन हे काम करण्यात आले. हे काम माहितीतील व्यक्तीने केल्याची शक्यता ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांनी व्यक्त केली आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने या ठीकाणी पोहचले.पथकाने घटनास्थळाची पाहणी करीत घटनेची माहिती घेतली आहे.