पुणे :पुणे शहरात काही दिवसांपूर्वी भरदिवसा एक विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला झाला होता. आता पुन्हा शहरातील टिळक रोडवर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला झाला. कोयत्याने झालेला हा हल्ला बुधवारी पहाटे झाला. हा हल्ला पैसे दिले नाहीत म्हणून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य जीवन गायकवाड, साहिल शंकर वाघमारे व अनिकेत संग्राम सरोदे (तिघे रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मुळचा नांदेडचा असलेल्या १९ वर्षीय बालाजी यल्लापा आरोटे याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या टिळक रस्त्यावर हा हल्ला झाला आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तत्काळ आरोपींना घेतले ताब्यात-
बालाजी आणि त्याचे मित्र कुणाल शेवाळे व ओम भिलारे हे सदाशिव पेठेतील एका अभ्यासिकेत अभ्यास करतात. हे तिघे बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अभ्यासिकेतून घरी जाण्यासाठी निघाले होते. टिळक रस्त्यावर शक्ती स्पोर्ट्स दुकानासमोहर आल्यानंतर त्यांच्यामागून एक दुचाकी आली. त्यावरील एकाने खाली उतरत तिघांना अडविले आणि पैशांनी मागणी केली. त्यांच्यात वाद झाल्यानंतर पैसे देत नसल्याच्या रागात तिघांवर कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. मात्र तिघांनी आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आरोपी पसार झाले. सुदैवाने या हल्ल्यात आरोटेसह त्याच्या तीनही मित्रांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन जणांना अटक केली आहे.