किरण शिंदे
पुणे: पोलीस सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने वाघोली पोलीस चौकीच्या बाहेरच स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केलेली घटना ताजी असताना चक्क आता एका तरुणाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातच पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
बारमालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वेळीच रोखल्याने दुर्घटना टळली. सोमवारी दुपारच्या सुमारास लोणीकंद पोलीस स्टेशनच्या आवारात ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सत्यम गावडे या तरुणाचा वाघोली परिसरात बार आहे. नियमानुसार रात्री दीड नंतर बार बंद करणे आवश्यक आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचे सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल असे लोणीकंद पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत. त्यामुळे बार बंद ठेवावा लागेल असे म्हणत या महिला अधिकाऱ्याने दमदाटी केली असा आरोप सत्यम गावडे या तरुणाने केला. मात्र बार बंद ठेवले तर आर्थिक नुकसान होईल या भीतीने या तरुणाने पोलीस स्टेशनच्या बाहेरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने दुर्घटना टळली. दरम्यान या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ या तरुणाच्या मित्रांनी मोबाईल मध्ये काढले होते. मात्र पोलिसांनी मोबाईल जप्त करून हे सर्व व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडल्याचा आरोपही या तरुणाने केलाय.
दरम्यान संबंधित बारमालक तरुणाकडून पोलीस दर महिन्याला ठराविक रक्कम घेत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून रक्कम वाढवून देण्यात यावी यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात होता असे त्या तरुणाचे म्हणणे आहे. त्याने रक्कम वाढवून देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्रास देण्यास सुरुवात केला. रात्री अपरात्री येऊन दुकानातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणे, खटले दाखल करणे, हॉटेल बंद करण्याची धमकी देणे असे प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरू होते. १ एप्रिलच्या रात्री संबंधित महिला अधिकारी त्याच्या दुकानात आल्या. बंद असलेल्या शटर उघडण्यास भाग पाडलं आणि रात्री दोन नंतरही बार सुरू ठेवतो का असे म्हणत हॉटेल बंद करण्याची धमकी दिली असल्याचे या तरुणाने सांगितले.