पुणे : बनावट तिकिटाच्या आधारे विमान प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका ट्रॅव्हल एजंटसह दोघांवर विमानतळपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. ११) उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ प्रशासनाच्यावतीने तुषार विश्वनाथ अंधारे (३२, रा. धानोरी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सलीम गोलेखान (२४, रा. मोहननगर, जमजम बिर्याणी हाऊस, चिंचवड) आणि नसरुद्दीन खान (रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सलीम याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलीम गोलेखान याचे चिंचवड येथे बिर्याणी हाऊस आहे. त्याला वडिलांसह तातडीने लखनौला जायचे होते. त्याने ट्रॅव्हल एजंट नसरुद्दीन खान याच्याकडून दोन तिकिटे काढली. ही तिकिटे इंडिगो एअर लाईनची होती. विमानतळावर प्रवेश केल्यावर सलीम याच्या वडिलांचे तिकीट ओरिजनल होते. यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र, सलीमचे तिकीट बनावट असल्याचे आढळल्याने त्याला अडवण्यात आले. त्याला तिकिटाबाबत चौकशी केली असता, त्याने ते नसरूद्दीनने काढून दिल्याचे सांगितले. एअरलाईनची फसवणूक करून विमानतळावर अतिसंवेदनशील परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संकेश्वरी करत आहेत.