लोकमत न्यूज नेटवर्क
पुणेः किरकोळ वादातून ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयत्याने हातापायावर वार करून एकाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह ६ जणांवर मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लक्ष्मी चव्हाण (वय ५५, रा. आंबेडकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मार्केट यार्डमधील आंबेडकरनगर येथे २५ व २६ मे रोजी घडली. ईश्वर दत्ता चव्हाण (वय ३९) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना देखील धक्काबुक्की केली आहे.
फिर्यादी महिलेची मुले ईश्वर व कृष्णा यांच्यात घरगुती कारणातून वाद सुरू होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारे आरोपी यांनी काठीने कृष्णाला मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी ह्या घाबरून त्यांच्या घराला आतून कडी लावून बसल्या होत्या. आरोपींनी तुम्ही बाहेर या, तुम्हाला दाखवतो असे धमकावून लोखंडी गजाने दरवाजाच्या कडीला बाहेर लावून त्यांना आत कोंडले. भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कडी काढून सर्वांना बाहेर काढले. त्यावेळी आरोपींनी पोलिसांसोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यानंतर आरोपींनी बुधवारी रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा ईश्वर त्यांच्या घराजवळ थांबला असताना, आरोपींनी त्याच्यासोबत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून त्याच्यावर कोयत्याने वार केले. हातापायावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. कदम अधिक तपास करीत आहेत.