पुणे : ‘आम्हीच जनता वसाहतीचे भाई आहोत,’ असे म्हणून दहशत निर्माण करीत तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैभव ज्ञानेश्वर शिंदे (वय १९) आणि संग्राम रवींद्र पाटोळे (वय २०, दोघेही रा. जनता वसाहत) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी सोमनाथ नेताजी वाडकर (वय २७) आणि शुभम ऊर्फ प्रसाद रंगनाथ देशमाने (वय २२, दोघेही रा. जनता वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. समीर सोपान शिवतरे (वय १९, रा. पर्वती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ४ एप्रिल रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास जनता वसाहत येथे हा प्रकार घडला. घटनेच्या दिवशी फिर्यादी आणि त्यांचे मित्र संकेत लोंढे हे घटनास्थळी थांबलेले होते. त्यावेळी नवनाथ वाडकर, वैभव मोरे, वैभव राऊत, वैभव शिंदे, संग्राम पाटोळे, शुभम देशमाने, सोमनाथ वाडकर, ऋषिकेश कांबळे हे जमाव करून फिर्यादीच्या समोर उभे राहिले. माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतो काय? इथला भाई फक्त मीच आहे, असे वाडकर फिर्यादीला म्हणाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात, दोन्ही हातांवर आणि पायांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते आणि दांडके तेथे जमलेल्या लोकांना दाखवून दहशत निर्माण केली. त्यामुळे तेथील नागरिक घाबरून पळून गेले होते, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींनी पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केला.