इंदापूर (पुणे): प्रेमसंबंधाची परिणिती लग्नामध्ये होईल असे स्वप्न रंगवणाऱ्या युवतीचा प्रियकर ऐन लग्नाच्या वेळी पळून गेला. त्यानंतर त्याच्या मामाने तिला विष घातलेला पेढा खायला देवून, तिच्या आयुष्यात विष कालवल्याचा प्रकार राजवडी (ता. इंदापूर) येथे घडला. या प्रकरणी प्रियकरासह त्याचे मामा व मावसभाऊ अशा चौघा जणांविरोधा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हर्षल मधुकर कदम, संतोष सुखदेव गलांडे, अकुंश सुखदेव गलांडे, स्वप्नील दत्तात्रय शिंगटे (सर्व रा. गलांडवाडी नं.१,ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्याच परिसरात असणाऱ्या गावातील 'त्या' दुर्देवी युवतीने त्यांच्या विरुध्द फिर्याद दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी की, चोवीस वर्षाची ही युवती गेल्या तीन वर्षांपासून वनगळी (ता. इंदापूर) येथील एस.बी.पाटील शैक्षणिक संकुलात इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगचा कोर्स करत आहे. तेथून जवळच असणाऱ्या राजवडी गावात दुध डेअरीत काम करणाऱ्या हर्षल मधुकर कदम याच्याबरोबर तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
१५ जुलै २०२२ रोजी त्या युवतीचे वडील, हर्षलचे मामा संतोष सुखदेव गलांडे, अकुंश सुखदेव गलांडे यांनी दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता, इंदापूरातील सिध्देश्वर मंदिरात त्या दोघांचा विवाह करण्याचे निश्चित केले. दोन्ही मामांनी पाच लाख रुपये हुंडा मागितला.
ऐन लग्नाच्या दिवशी हर्षल घरातून कोठेतरी निघून गेला आहे. त्यामुळे हे लग्न आता होवू शकत नाही, असे त्याच्या मामांनी त्या युवतीच्या वडीलांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता राजवडी गावात एकत्र बसून काहीतरी तोडगा काढू असे सांगून ते निघून गेले.
ठरल्यावेळी तिचे आईवडील व संतोष गलांडे, अकुंश गलांडे, स्वप्नील शिंगटे हे राजवडी येथे एकत्र बसून चर्चा करत असताना अकुंश गलांडे त्या युवती जवळ आला. तिला बाजुला घेऊन 'झालेला प्रकार हा खुप वाईट झाला, आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू' असे म्हणत त्याने त्याच्या खिशातील कागदातून एक पेढा काढला. 'हा देवाचा पेढा आहे. तो खाल्ल्यावर सर्वकाही चांगले होईल' असे सांगून त्याने सर्वांसमक्ष तो पेढा तिला खायला लावला. थोडा वेळ बोलून ते तिघे तेथून निघून गेले. ती युवती आई वडिलांबरोबर घरी आली. आई वडील शेताकडे गेल्यानंतर तिला चक्कर येवून उलट्या होवू लागल्या. त्या रात्री नऊ वाजता तिला उपचारासाठी इंदापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
४ ऑगस्ट पर्यंत तिला शुध्द नव्हती. शुद्धीवर आल्यानंतर, तिने विषारी औषध घेतले होते का अशी शंका तिच्या आईला आली होती. तशी विचारणा केली असता तिने नकार दिला. हर्षलच्या मामाने पेढा खायला दिल्यानंतर आपल्याला त्रास झाल्याचे तिने सांगितले. नंतर आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील अधिक तपास करत आहेत.