लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘पोलिसांकडे तक्रार दिल्याने आमचे एक लाख रुपये खर्च झाले ते पैसे दे,’ असे म्हणून एका तरुणाचा खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणाने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली. ही घटना गणेश पेठेतील नागझरी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर २८ जून रोजी रात्री आठ वाजता घडली होती. फिर्यादीने घाबरुन सुरुवातीला तक्रार दिली नव्हती.
फिर्यादी तरुणाने आरोपींच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर तो २८ जून रोजी रात्री घरी जात असताना या टोळक्याने त्यांच्या गळ्याला कोयता लावून ‘आमच्याविरुद्ध तू पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घे. तुझ्या तक्रारीमुळे आमचा एक लाख रुपये खर्च झाला आहे. तो देखील दे. नाही तर तुला मारुन नागझरी नाल्यात टाकून देईन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीची तक्रार आहे.
पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांनी विरोध केल्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी तो चुकविला. सहायक पोलीस निरीक्षक अभंग अधिक तपास करीत आहेत.