पुणे : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये सहा विधीसंघर्षित मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना (दि. २१) रात्री पावणेआठच्या सुमारास नवी पेठेतील सलून व टॅटूच्या दुकानात घडली.
याप्रकरणी सनी विनोद महापुरे (वय १९, रा. फालेनगर कोथरुड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ऋषिकेश जालिंदर कांबळे (वय २१), यश संजय चव्हाण (वय २०, रा. दोघे, दत्तवाडी), प्रतीक युवराज शिंदे (वय १८, रा. मंगळवार पेठ), स्वराज निलेजय वाडेकर (वय २०, रा. नानापेठ), वैभव नितीन शहापूरकर (वय २०, रा. गवळीवाडी), देविदास बाळासाहेब गालफाडे (वय २२, रा. विश्रांतवाडी) या सहा जणांना अटक केली आहे. एकूण १२ जणांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी याचा भाऊ केएम ऊर्फ कानिफनाथ याची आरोपीपैकी एक असलेल्या विधीसंघर्षित मुलासोबत भांडण झाले होते. कानिफनाथ हा त्याला मोबाईलवर फोन करून सतत शिवीगाळ करत होता. त्यातूनच त्याने त्याच्या इतर साथीदारांना एकत्र करून केएमवर हल्ला करण्याचा बेत रचला. हे सर्वजण एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. केएम हा त्याच्या भावाच्या नवी पेठेतील झेड अॅण्ड ब्लॅक युनिसेक्स नावाच्या सलून आणि टॅटूच्या दकानात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टोळक्याने दुकानात घुसून केएम समजून आतेभाऊ मिसाळ याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याने वार चुकवत मी केएम नाही असे म्हणत पळ काढला. त्यानंतर टोळक्याने दुकानाची काच फोडून हातात कोयता नाचवत आम्ही नाना पेठेतील भाई आहोत, आमच्या नादी लागले तर एकएकाला कापून टाकू असे म्हणत दहशत निर्माण केली. त्यावेळी घाबरून दुकादारांनी आपली दुकाने बंद केली. सुरुवातीला तक्रार देण्यास तक्रारदार समोर आला नव्हता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास केला असता, हा प्रकार समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.