बावडा : येथील रश्मीकांत तोरणे या युवकाच्या हत्याप्रकरणी आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या खटल्याची सुनावणीदेखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १२) रात्री प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी तोरणे कुटुंबीयांना धमकावत हल्ल्याचा प्रयत्न केला. बावडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मीकांत खून खटल्याची सुनावणी गुरुवार (दि. १३) पासून सुरू करण्यात आली. या घटनेची हकीकत अशी, की रश्मीकांत याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणास तब्बल १६ महिन्यांनी वाचा फुटली. त्यानंतर आरोपींना जेरबंद केले. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन युवकांचा समावेश असून, त्यां संदर्भात दि. १३ पासून खटल्याची सुनावणी सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे एका आरोपीच्या वडिलांनी काही गुंडांच्या मदतीने रात्री तोरणे कुटुंबीयांना घरी जाऊन धमकावले. ‘‘न्यायालयात कोण साक्ष द्यायला येतो ते पाहून घेतो. तुमच्या मुलाचा जो प्रकार केला तशीच तुमची अवस्था करू’’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याबाबत अण्णासाहेब तोरणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रश्मीकांत हत्येनंतर तोरणे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण दिले आहे. बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच दक्षता घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. (वार्ताहर)
आरोपीच्या नातेवाइकाचा तोरणे कुटुंबीयांवर हल्ल्याचा प्रयत्न
By admin | Published: October 14, 2016 5:30 AM