काटेवाडी (बारामती): विरोधक खोटे नाटे आरोप करतात. खालच्या पातळी वर जाऊन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. प्रतिभा काकी मला आईसारख्या आहेत. पण त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. माझा विरोधक असला तरी मी त्याचे काम मार्गी लावतो. मग घरातल्यांबाबत असे होईल का, असा सावाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या ‘टेक्सटाइल’ प्रकरणावरुन केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती येथे प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, बारामतीकरांनी मला लोकसभेला जोरात झटका दिला, पाठीमागे मी एकटाच पडलो होतो. आता माझी आई व बहिणींसह माझे कुटूंब सोबत आहे. बारामतीकर हेच माझे कुटुंब आहे. विरोधक भावनिक करतात. त्यांना सडेतोड उत्तर द्या. कोणाला घाबरण्याचे कारण नसल्याचा इशारा पवार यांनी दिला. अजित पवारला मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काहींकडून केला जात आहे. मला मत म्हणजे ते राष्ट्रवादीला पर्यायाने महायुतीला मत असेल, असे देखील उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
बारामती राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बारामतीकरांनो वडीलकिच्या नात्याने असं काम करा, बारामती तालुका देशात एक नंबर तालुका करायचा आहे, नाद करायचा नाही नाद, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचे राजकीय स्थान अधोरेखित केले. आजचा दिवस आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. बारामतीकरांनी मला सात वेळा आमदार, एक वेळा खासदार केले. मी आठव्या वेळेस निवडणूकीत उभा आहे. मागील वेळेस विरोधी उमेदवाराचे डिपाझीट जप्त केले. सगळ्यांचे डिपाॅझिट जप्त करणारे बारामती कर असतात, त्यामुळे सर्वाधिक विकासाचा निधी आणला, असा दावा उपमुख्यमंत्री पवार यांनी केला.
सुरवातीच्या काळात साहेबांनी बारामतीचे नेतृत्व केले. त्यानंतर मी नेतृत्व करू लागलो. परंतु आमच्या दोघांच्या काळात कधीही लोक पैसे देऊन आणावी लागली नाहीत. पण आता सभेला आणलेल्या महिला टीव्हीसमोर आम्हाला पैसे दिले नाहीत, चहा-पाणी नाही, असे सांगत आहेत. ५०० रुपये देऊन महिला आणल्या जात आहेत. ही पद्धत बारामतीत कधी नव्हती. या सवयी झेपणाऱ्या नाहीत. तुम्हाला नादच करायचा असला तर मग मी पण पुरून उरेन, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतणे युगेंद्र पवार यांचे नाव न घेता दिला. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका लागतील. सगळेच लोक उद्योगपती, श्रीमंत नाहीत, काही ठिकाणी भगिनींना तिकिटे द्यावी लागतात. त्या कुठून पैसे देवून लोक आणणार, कुठून जेवणाची कुपन देणार असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.