धायरी: शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, या वाढत्या संसर्गाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं, यासाठी पुण्यात पाच ठिकाणी चोवीस तास लसीकरणाची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयातील लसीकरण केंद्राची व्यवस्था आणि हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची आणि बेड्सची स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी आले होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका राजश्री नवले उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, सध्या शहरात १०९ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. आत्तापर्यंत सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरात लवकर कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. खासगी हॉस्पिटलमधील ५० टक्के बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या महापालिकेकडे ५ हजार पाचशे बेड उपलब्ध आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी शहरात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. त्याचबरोबर शहराच्या प्रत्येक भागात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत पण ते घरात क्वारंटाईन राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी 'कोविड केअर सेंटर्स' पुण्यातील येरवडा, खराडी, चंदननगर, कोंढवा या भागात एक हजार बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. पुण्याच्या सर्व भागात 'कोविड केअर सेंटर्स' उभे करून साधारण पाच हजार बेड्सचं नियोजन असून शिवाय सिंहगड इन्स्टिट्यूट व बालेवाडीला गेल्यावर्षीप्रमाणे लवकरच 'कोविड केअर सेंटर' सुरु करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
-----------------
फोटो ओळ: महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयातील लसीकरण केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेताना मुरलीधर मोहोळ, भीमराव तापकीर, राजश्री नवले.