पुणे : काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना सोमवारी (दि. २४) पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून पक्षाच्या वतीने नीलेश देसाई यांच्या सहकार्याने हे कॉन्सन्ट्रेटर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले की, विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते निश्चित करून तिथे दररोज गरीब, कष्टकरी वर्गाला जेवण देण्यात येत आहे. महिला आघाडीच्या वतीने अनेक महिला कार्यकर्त्या घरामध्येच ५ ते १० जणांचे जास्तीचे जेवण तयार करून ते परिसरातील रुग्णालयांमध्ये देतात.
काँग्रेस भवनमधील कोरोना रुग्ण सहायता केंद्रामधून दररोज रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच औषधे, इंजेक्शन रुग्णवाहिका, रुग्णाला प्रवेश या प्रकारची मदत करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, स्थानिक तसेच शहर स्तरावरही मदतकार्य केले जात असल्याचे बागवे म्हणाले.