चांदूस येथील गणेशनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी २५ ते ३० डंपर गाड्यांच्या साहाय्याने राजगुरुनगर नगरपरिषदेचा कचरा रात्रीच्या सुमारास टाकण्यात आला होता. रात्रीच्या झालेला प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला नाही. सकाळी दुर्गंधी सुटल्याने तसेच मोठ्या प्रमाणात कचरा येथील गट नंबर ४३१ मध्ये टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यामधील एक गाडी ग्रामस्थांनी अडवून ठेवली. राजगुरुनगर नगरपरिषदेने या ठिकाणी कोणत्या कारणाने कचरा टाकला हे ग्रामस्थांच्या प्रथम लक्षात आले नाही. शासनाने याठिकाणी डम्पींग ग्राउंड केले का असा संशय ग्रामस्थांना आला. परंतु ग्रामपंचायतने कोणतीही परवानगी नसताना राजगुरुनगर नगरपरिषदेने या ठिकाणी कचरा टाकला असे लक्षात आले. या परिसरात कचरा टाकलेल्या ठिकाणापासून पाणी पिण्याचा हातपंप अत्यंत जवळ आहे. वस्तीवर एकच हातपंप असल्याने पाणी खराब होण्याची शक्यता असून लोकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. तसेच या परिसरात टाकलेल्या कचऱ्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या चंद्रभागा गणपत कारले, शांताबाई चंद्रकांत पडवळ, यमुना नामदेव कारले, अलका शंकर कारले ,नामदेव आप्पा कारले या ग्रामस्थांना उलट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या विनोद गणपत कारले, प्रसाद दत्तात्रय कारले, राजेंद्र तुळशीराम कारले, अशोक बाळासाहेब कारले, शंकर बाबू कारले, विलास ज्ञानेश्वर गाढवे यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. या वेळी येथील सरपंच रूपाली कारले व उपसरपंच नैना कारले, ग्रामपंचायत सदस्य रामदास सांडभोर, दिलीप कारले, मनोर गाढवे, किसन,कारले ,राहुल कारले यांनी कचरा टाकण्यात आलेले डंपर अडवून ठेवले.
या ठिकाणी कोणत्या कारणाने कचरा टाकत आहे असा सवाल केला यावेळी वाहनचालकाला केला. कचरा टाकण्याचा ठेका कोणाला आहे, या ठिकाणी कोणाच्या सांगण्यावरून कचरा टाकण्यात आला, असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी विचारले. परंतु त्याने उत्तर दिले नाही. यावेळी नगरपरिषदेचे काही नगरसेवक या ठिकाणी कचरा टाकून द्या अशी विनंती करण्यासाठी आले होते. परंतु ग्रामस्थांनी ठाम विरोध केल्याने यापुढे या ठिकाणी कचरा टाकणार नाही असे त्यांनी सांगितले. सरपंच रूपाली कारले व उपसरपंच नैना कारले यांनी या ठिकाणी टाकलेला कचरा नगरपरिषदेने पुन्हा उचलून या अशी मागणी केली. अन्यथा, या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या धोक्याला नगरपरिषद पूर्णता जबाबदार राहील असे सांगितले.
फोटो :
कचरा टाकण्यासाठी आलेला डंपर ग्रामस्थांनी काढून ठेवला याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ.