पुणे : देशातील सर्व अल्पसंख्याक एकत्र केले तर ही लोकसंख्या ६५ टक्क्यांपर्यंत जाते. अल्पसंख्याकांचे सत्य हा सध्या जागतिक पातळीवरचा प्रश्न झाला आहे. भाषा आणि धार्मिक पद्धतीने अल्पसंख्याक ठरणाऱ्या समाजाच्या हक्काचे रक्षण गरजेचे झाले आहे. हक्क आणि अधिकार याबाबतीत दुजाभाव करणे हे हिंदुराष्ट्राकडे नेण्याचे प्रयत्न असून देशाला धोका निर्माण झाला आहे. घटनेला अपेक्षित समाजनिर्मिती करताना यामुळे अडथळे निर्माण होत आहेत,असे मत भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी सोमवारी (दि. २२) व्यक्त केले.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आॅनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, 'सत्तास्थानी असलेल्या पक्षाचा संसदेत एकही मुस्लिम खासदार नाही. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे राजकीय स्थान कमी करण्यात आले असून समाजाच्या हिंदुकरणाची प्रक्रिया वाढली आहे. बहुसंख्यांकप्रिय राजकीय व्यवस्थेत मुस्लिम, आदिवासी आणि अन्य घटकांना बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू आहेत,'
’अस्तित्व, हक्क, अधिकार यासाठी अल्पसंख्याकांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र आले पाहिजे. सुधारक हमीद दलवाईंचा विचार पुनरुज्जीवित केला पाहिजे. देश स्वतंत्र झाल्यानंतर असलेले राजकीय स्थान कमी झाले आहे. मुस्लिमबहुल भागात सोयीसुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. भारतात अदृश्य ते सत्य मानून वस्तुस्थिती नाकारली जाते. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
-------