पुणे : प्रेमाचे नाटक करून तरुणाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रुपये, सोन्याचे दागिने घेऊन त्रास दिल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून हा प्रकार उघडकीस आला.
युवराज मल्हारी सोनवणे (वय ३१, रा. सावरकरनगर, टिटवाळा, कल्याण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खडकीतील संबंधित तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खडकी रेंजहिल्समधील इडब्ल्यूएस सोसायटीत १५ मार्च रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज सोनवणे हा टिटवाळा येथे राहतात. त्यांचे ज्योती नावाच्या तरुणीबरोबर २०१७ पासून प्रेमसंबंध होते. ज्योती गिरी हिने प्रेमाचे नाटक करून युवराज व तिचे एकत्र असलेले फोटो व व्हिडीओ इतरांना पाठविण्याची व पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतरही त्यांच्याकडे मागणी करून त्याला मानसिक त्रास देत होते. १४ मार्च रोजी युवराज घरातून बाहेर पडला. ते थेट खडकीतील इडब्ल्यूएस सोसायटीत आला. याच सोसायटीत ही तरुणी राहते. त्याचा तिच्याबरोबर वाद झाल्यानंतर त्याने याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरील जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात या तरुणीने फसविले असून ती व तिचे नातेवाईक देत असलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ तपास करीत आहेत.