Laxman Hake News ( Marathi News ) : गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे, या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याचे दिसत आहे. दरम्यान, काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणी स्वत: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मराठा आंदोलकांवर आरोप केले आहेत.
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव
काल सोमवारी रात्री पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मराठा कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. तर लक्ष्मण हाके यांनीही तक्रार दिली आहे. २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले, मी मद्यप्राशन केले आहे की नाही हे पोलीस बघून घेतील. ते मेडिकल करतील. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत त्या आरोपाची शहानिशा पोलिस करतील. असे आरोप करुन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला आधी यातील काही लोक भेटून गेले आहेत. हा पूर्वनियोजित कट आहे, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.
मेडिकलसाठी तयार आहे
"माझ्यावर जर मद्यप्राशनाचा आरोप होत असेल तर मी पुढच्या चौकशीसाठी तयार आहे, मी मेडिकलसाठीही तयार आहे. जर माझ्यावर मद्यप्राशनाचा आरोप करुन आमचा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असेल तर हे होणार नाही. मी जर मद्यप्राशन केले असेल तर माझ्या रक्तात दिसेल, मी मेडिकलसाठी तयार आहे, असंही हाके म्हणाले.
"ही घटना रात्री सातच्या दरम्यान घडली. या लोकांनी मला पकडून मद्यप्राशन केले की नाही सांग असं सांगत होते. यावेळी त्यांनी मोठ, मोठ्याने घोषणा सुरू केल्या. मी मित्राच्या घरी जेवण्यासाठी गेलो होतो त्यामुळे मी पोलिस संरक्षण खाली थांबवले होते. मी ओबीसींचे आंदोलन कधीही सोडणार नाही. याआधीही जालना जिल्ह्यात माझ्यासोबत असे प्रकार घडले आहेत, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.