पुणे : जिल्ह्यात पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता कोरोनामुळे बंद केला आहे. मात्र, समाज कल्याण विभागाने व एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सर्व विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेत उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी पहिली ते चौथीमधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपयोजन क्षेत्राव्यतिरिक्त अन्य भागातील अनुसूचित जाती/जमातींच्या दारिद्रयरेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो. शाळेत नियमित उपस्थिती राहणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक रुपये २२० कमाल मर्यादेच्या अधीन राहून एका दिवसाला एक रुपया याप्रमाणे एकूण वर्षाच्या ७५ टक्के हजेरी असणाऱ्या मुलींना हा उपस्थिती भत्ता दिला जातो.
कोरोना काळात विद्यार्थिंनींसाठी राबविल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ दिला जाऊ नये, असे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिंनींचा उपस्थिती भत्ता बंद झाला आहे. मात्र, या योजनेमुळे प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी होऊन शाळेतील मुलींच्या उपस्थितीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ही योजना बंद करण्याऐवजी उपस्थिती भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.
—
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कोरोनामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थिंनींचा उपस्थिती भत्ता यंदा दिला जाणार नाही.
- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
—-
कोरोनामुळे समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणारी एकही योजना बंद केलेली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे राबविल्या जात असलेल्या योजनेद्वारे विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिला जातो, असे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
——
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात सुमारे २६ हजार विद्यार्थीनींना लाभ दिला जातो. दोन दिवसांपूर्वीच या विद्यार्थिंनींच्या उपस्थिती भत्त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित केली आहे.
—-
राज्यातील उपस्थिती भत्ता मिळणाऱ्या विद्यार्थिंनींची आकडेवारी
वर्ष लाभार्थी विद्यार्थिनी योजनेवरील खर्च
२०१४-१५ २,४०,४४० ५,२८,९७,०००
२०१५-१६ २,५१,४४० ५,५३,०२,०००
२०१६-१७ ३,७३,२७२ ८,२१,२०,०००
२०१७-१८ १,४७,६८२ ३,२४,९१,०००
२०१९-२० १,८४, ८०४ ३,२४,९३,०००
२०२०-२१ १,८४, ८०४ ४,०६,५७,०००