अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:14 PM2023-07-05T21:14:38+5:302023-07-05T21:15:34+5:30
जुन्नर शरद पवारांना मानणारा तालुका असल्याने बेनके जनतेशी संवाद साधून नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार
नारायणगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यास जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी उपस्थिती दर्शविली, त्यांना लेखी पाठिंबा पण दिला मात्र आजच्या दोन्ही सभांना उपस्थित नसल्याने सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते नॉटरिचेबल आहेत.
दरम्यान, बुधवारी झालेल्या दोन्ही सभेस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, तसेच जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून समतोल साधल्याने जुन्नरची राष्ट्रवादी ही शरद पवार की अजित पवार यांची हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जुन्नरचे अतुल बेनके कोणासोबत आहेत याची उत्कंठा पुणे जिल्ह्याला लागली आहे. जुन्नरमध्ये चमत्कार करण्याची ताकद शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये आहे, त्यातच शरद पवार यांनी जाहीर केल्यानुसार ते किल्ले शिवनेरीपासून आपल्या दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. जुन्नर तालुका हा शरद पवार यांना मानणारा तालुका आहे. म्हणून बेनके यांनी सावध भूमिका घेत जनतेशी संवाद साधून नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते नॉटरिचेबल आहेत.
जुन्नर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले की, बेनके दोन्ही सभांना उपस्थित नव्हते, ते येत्या पाच-सहा दिवसांत जुन्नर तालुक्याचा दौरा करणार आहेत, सर्व पदाधिकारी आणि जनतेचे मत घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. मी व तालुक्यातील पदाधिकारी प्रथम अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहिलो, त्यानंतर तेथून आम्ही शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहिले आहोत.