आकर्षक महाल, फुलांच्या आरासमध्ये बाप्पा विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 01:08 AM2018-09-21T01:08:15+5:302018-09-21T01:08:36+5:30
गणेशोत्सव पुणेकरांसाठी एक उत्साहाचे वातावरण असणारा उत्सव आहे.
पुणे : गणेशोत्सव पुणेकरांसाठी एक उत्साहाचे वातावरण असणारा उत्सव आहे. अनेक मंडळे विविध विषयांवरील ऐतिहासिक, पौराणिक, असे देखावे सादर करतात. या वर्षी मात्र बहुसंख्य मंडळांचे गणपती आकर्षक महाल व फुलांच्या आरासमध्ये विराजमान झाले आहेत.
फर्ग्युसन रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळाने यंदा आकर्षक काल्पनिक महाल तयार केला आहे. या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे दिवस आणि रात्री दोन्ही वेळी हा वेगळ्याच प्रकारे उठून दिसतो. रात्री मंडळाने लावलेल्या एलईडीच्या विद्युत रोषणाईने मंदिर उत्तम दिसत आहे. ज्ञानेश्वर पादुका चौकातील ज्ञानेश्वर मित्र मंडळाने विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचा आकर्षक रथ तयार केला आहे. जवळपास २० फुटी विठ्ठल रखुमाईची मूर्ती हे देखाव्याचे आकर्षण ठरत आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील उत्कर्ष मित्र मंडळाने स्त्री अत्याचारावर जनजागृती हा देखावा सादर केला आहे. सध्या समाजात स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्यावर होणारे अत्याचार हे कसे कमी करता येतील यावर जनजागृती करून जिवंत देखावा सादर केला आहे.
डेक्कन जिमखानाजवळील चैतन्य मित्र मंडळाची शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल असून, यंदा ९६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने या वर्षी संतपरंपरा टिकवून संत गोरा कुंभार यावर देखावा सादर केला आहे. डेक्कन जिमखाना चौकातच हे मंडळ असल्याने व विषयाची उत्तम मांडणी या गोष्टीमुळे देखावा पाहण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीजजवळील श्री गजानन मंडळाने काल्पनिक महाल तयार केला आहे. या काल्पनिक महालाच्या आता मधोमध एक तलावात असणारी पांढरी शुभ्र बदके महालचे आकर्षण ठरत आहे.
तुळशीबागेतील शिवशक्ती मंडळाने विठ्ठलाची प्रतिकृती असणारा महाल तयार केला आहे. वैभव चौकातील नगरकर तालीम मंडळाने विविध रंगाच्या फुलांची आरास तयार केली आहे.
केळकर रस्त्यावरील बालविकास मंडळाने यंदा गणपतीचे कायमस्वरूपी असणारे नक्षीकाम व कोरीव काम केलेले मंदिर तयार केले आहे. तसेच मंडळाकडून दहा दिवस सर्व गणेशभक्तांसाठी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
श्री गणेश आझाद हिंद मंडळाने ओढण्याचा वापर करून एक भव्य महालात बाप्पा मधोमध विराजमान झाले आहेत. पासोड्या विठोबा मंदिराजवळील श्री सत्यशोधक मारुती मंडळाने १० फुटी रंगीबेरंगी फुलपाखरू तयार केले आहे. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे फुलपाखरू रोषणाईमध्ये फारच उठून दिसत असून त्याचे हलणारे पंख हे एक विलोभनीय दृश्य वाटते.
गुरुवार पेठेतील श्री मंगल क्लब मित्र मंडळाने ‘तारकासुराचा वध’ हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. देखाव्यात असणारी शंकराची आणि तारकासुराची मूर्ती पाहण्यासाठी नागरिक व लहान मुलांची गर्दी होत आहे.
शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षी मंडळाने उत्तर गुजरातमधील पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. श्री सुंदर गणपती तरुण मंडळाने ‘टू बी आॅर नॉट टू बी’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून आजकालची तरुण मुले ही दारू, सिगारेट या घातकी व्यसनाबरोबरच मोबाईल या व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर आणि तरुणांवर व त्यांच्या जीवनावर कसे वाईट परिणाम होतात हे दाखवले आहे. शुक्रवार पेठेतील वस्ताद शेख चांद नाईक तालीम मंडळाने यंदा काल्पनिक हत्ती महाल साकारला आहे.
गोखले स्मारक मित्र मंडळाने सायबर क्राइम हा विषय हाताळून त्याबद्दल जनजागृती केली आहे. सोमवार पेठेतील दारूवाला पूल मंडळाने स्त्रीभ्रूणहत्या या विषयाला अनुसरून लेक वाचवा हा देखावा सादर केला आहे. सोमवार पेठेतील खडीचे मैदान मंडळाने श्रीकृष्णाची मूर्ती असणारा काल्पनिक महालाचा देखावा साकारला आहे. महालावरील सुंदर अशी विद्युत रोषणाई गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
>शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मंडळे
शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यंदा मंडळाने पांडुरंग आणि संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांची मूर्ती असणारा भक्ती महाल साकारला आहे.
हँगिंग मांडव या संकल्पनेतून मंडळाने अॅम्बुलन्स आणि अग्निशमनवाहिका जाईल एवढी जागा मांडवाखाली सोडली आहे. लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब हसबनीस यांनी १८९४ साली मंडळाची स्थापना केली. पुण्यातील प्रथम सात गणपतींमध्ये हसबनीस बखळ मंडळाच्या गणपतीचे नाव घेतले जाते.
कसबा पेठेतील श्री शिवाजी मंडळ झांबरे चावडी यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यंदा या मंडळाने गजमहाल साकारला असून, तीन कमानी व रंगीबेरंगी कापडी सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत.