खोडद : जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोपरे मांडवे परिसरातील भागाचा दौरा करून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आमदार अतुल बेनके यांनी जाणून घेतल्या. दरम्यान दौरा करत असताना एक शेतकरी नांगर हाक असल्याचे दिसताच त्यांनीही थेट शेतात दाखल झाले आणि त्या शेतकऱ्याकडून नांगर स्वत:कडे घेत आमदार बेनकेंनी औत हाकला.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे मांडवे भागातील परिसरात गावांचा दौरा करत अनेक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. विविध समस्यांबाबत चर्चा केली. दुर्गम भागात शेती करून उपजीविका करत असताना काय काय अडचणी येतात हे जाणून घेतले. माजी आमदार वल्लभ बेनके यांनाही शेतीविषयी प्रचंड आवड आहे. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात नवीन पिढीला नांगर धरणे व औत हाकणे या गोष्टींची कल्पना नाहीये. आधुनिकीकरण करत असताना नवीन पिढीने खेड्यापाड्यातील ही आपली कृषीसंस्कृती देखील अनुभवली पाहिजे व जपली देखील पाहिजे. कृषी संस्कृती आणि आपलं नातं हे अतूट आहे. आपली समृद्ध अशी कृषी संस्कृती जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गाव-शिवार सुजलाम सुफलाम करणे हेच ध्येय समोर ठेवून आपण वाटचाल करत आहोत, असे आमदार बेनके यांनी सांगितले.
खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पामुळे तालुक्यात मोठे उद्योग येऊ शकले नाहीत. यामुळे जुन्नरचा मुख्य आर्थिक स्रोत हा शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. सध्याच्या काळात शेती करणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले आहे. त्यातल्या त्यात आदिवासी व दुर्गम भागात शेती करून उदरनिर्वाह करणे एक प्रकारचे आव्हानच आहे. पुढील काळात शेतकऱ्यांनी वातावरण व निसर्गाशी अनुकूल अशी शेती करण्याशिवाय पर्याय नाही.
अतुल बेनके, आमदार, जुन्नर
२३ खोडद
काेपरे मांडवे येथील एका शेतात हौत हाकताना आमदार अतुल बेनके.