पुणे : आपण पृथ्वीवर जन्माला येऊन चूक केली आहे. कारण येथील सर्व पर्यावरण आपण नष्ट करीत जात आहोत. जे घेत आहोत, त्या प्रमाणात आपण देत नाही. नुसतं घेत आहोत. आता आपण केलेली चूक पुढच्या पिढीला भोगावी लागणार आहे. म्हणून त्यांना निसर्ग शिक्षण देऊन संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केले.
शिक्षक-पालक यांच्याकरिता तयार केलेल्या निसर्गशाळा या मार्गदर्शक पुस्तक संचाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी भांडारकर संस्थेत झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत होते. आयकाॅस संस्थेच्या केतकी घाटे, मानसी करंदीकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ग्राममंगल संस्थेच्या सहयोगाने आणि डायमंड प्रकाशनाने ते प्रकाशित केले. ग्राममंगलच्या प्राची नातू उपस्थित होते. केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी आपल्या २० वर्षांतील पर्यावरणविषयक कामाचा आढावा घेतला.
अतुल कुलकर्णी म्हणाले, निसर्गावर पुस्तक लिहून चालणार नाही. तसेच केवळ शिक्षकही चालणार नाहीत. कारण निसर्गशिक्षणासाठी पॅशन असलेली माणसं हवीत. पालक, स्वयंसेवक हवीत. अन्यथा पुस्तकं तर धूळ खात पडलेली आहेतच. त्यात आणखी याची भर पडेल. निसर्ग संवर्धनाचे पॅशनचे मिशन व्हायला हवं.
निसर्गावरचं प्रेम काय आहे हो? प्रथम निसर्गप्रेमींनी जंगलात जायचे थांबविले पाहिजे. जर एखादा पेशंट आयसीयूमध्ये असेल, तर आपण तिथे बाहेर थांबून कोणाला आत सोडत नाही. तसेच निसर्गात न जाता शहरातील लोकांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी काम केले पाहिजे. केवळ निसर्गात फोटो काढणं म्हणजे निसर्गप्रेम नव्हे, निसर्गात कोणाला जाऊ न देणे म्हणजे निसर्गप्रेम होय, असेही अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
विवेक सावंत म्हणाले, शाळा निसर्गासारखी हवी. निसर्ग हीच शाळा भविष्यात असेल. हे पुस्तक भिंतीची शाळा पाडून टाकणार आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट माणूस घडविणं आहे. आता पर्यावरणावर अरिष्ट आलंय. ग्रेटाचे ऐकून एक कोटी मुलांनी शाळा सोडली आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट हवं की आम्ही निसर्गावर आक्रमण करणार नाही. शोषण करणार नाही तर त्याचे दोहन करणार. ज्ञानासाठी कृती करावी लागते. कृती करणं आवश्यक आहे. शिक्षणशास्त्री लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे निसर्गाचा वास्तुपाठ आहे.
कोडिंग कोडिंग करत बसू नका !
सध्या निसर्गविषयक बुद्धिमत्ता निर्माण व्हायला हवी. कारण हवामान बदलावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, अन्यथा त्याची किंमत चुकवावी लागेल. या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी भविष्यात ग्रीन काॅलर जाॅब निर्माण होतील. त्यामुळे त्यासाठी काम करायला हवे. केवळ कोडिंग कोडिंग करीत बसू नये, असे सावंत यांनी सांगितले.