पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिक रणाकडून पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता वाढविण्याकरिता सुविधा भूखंडांचा ‘ई-लिलाव’ करण्यास सुरुवात केली असून हे भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खासगी विकसकांना देण्यात येणार आहेत. या ई-लिलाव प्रकियेमध्ये मांजरी बुद्रुक, वाघोली, पिसोळी, हिंजवडी, बावधन बुद्रुक, म्हाळुंगे येथील भूखंडांचा समावेश आहे. या भूखंडांचा शाळा व रुग्णालयांसाठी वापर आरक्षित करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.पीएमआरडीएने विविध प्रकल्प हाती घेतले असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडील जमिनींपैकी भूखंड भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत. ई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निविदाधारकांसाठी १५ डिसेंबरपासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या कार्यालयामध्ये २० डिसेंबर रोजी निविदा पूर्वबैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पीएमआरडीएकडून सुविधा भूखंडांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:45 AM