पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेवक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, त्यासाठी आवारात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. तीन पॅनलचे उमेदवार रिंगणात असून, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यापीठात आॅनड्युटी निवडणूक प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे. पुणे विद्यापीठ सेवक सहकारी पतपेढीची निवडणूक दर पाच वर्षांनी होत असते. यंदा ही निवडणूक ५ मे रोजी होणार आहे. विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी या पतपेढीचे सभासद असतात. सध्या सभासदांची संख्या सुमारे ७७० आहे. या निवडणुकीसाठी भारतीय कामगार सेना, कर्मचारी संघ पुणे विद्यापीठ आणि संघर्ष पॅनल असे तीन पॅनल रिंगणात उतरले आहेत. सर्व पॅनलने विद्यापीठाच्या आवारात मोठे फ्लेक्स लावले आहेत. तसेच त्यांची चिन्हेही ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. राजकीय निवडणुकांप्रमाणे विद्यापीठात निवडणुकीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कामावर हजेरी लावून प्रचार केला जात आहे.सध्या विद्यापीठात दुपारच्या सुटीनंतर सर्व जण पॅनलचे पदाधिकारी प्रचारात गुंतले आहेत. प्रत्येक विभागाला भेटी देत, पत्रकांचे वाटप करीत मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र आॅनड्युटी असताना प्रचार करण्यास बंधने असताना त्याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. कामाचे ठिकाण सोडून पदाधिकारी प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कामावरही परिणाम होत आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नजरेस मात्र हा आॅनड्युटी खुला प्रचार पडलेला नाही. (प्रतिनिधी)हा प्रकार चुकीचाविद्यापीठाची वेळ सकाळी १०.२० ते सायंंकाळी ६ ही आहे. या वेळेत निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. मात्र अद्याप आम्हाला आॅनड्युटी प्रचार सुरू असल्याचे निदर्शनास पडलेले नाही. तसेच विद्यापीठात मागील पंचवार्षिक निवडणुकी वेळीही फ्लेक्स लावले होते. निवडणुकीत सर्व जण विद्यापीठातीलच असल्याने त्यांना परवानी देण्यात आली आहे, असे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठात आॅनड्युटी निवडणूक प्रचार
By admin | Published: April 29, 2015 1:15 AM