पिंपरी : देशभर चर्चेत आलेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्याकडे असलेल्या आलिशान कारवरील दंडाची रक्कम भरण्यात आली. खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणे, अंबर दिवा लावणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर यांच्या कारवर २७ हजार ४०० रुपयांचा दंड आकारला होता. खेडकर यांचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्यांच्या चालकाने निगडी वाहतूक विभागात येऊन दंडांची ही रक्कम भरली.
विविध कारणांसाठी मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आयएएस पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी ऑडी कार (एमएच १२/एआर ७०००) वर महाराष्ट्र शासन असे लिहिले. तसेच कारवर अंबर दिवा लावला होता. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी या कारवर मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार कारवाई केली होती. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवर २७ हजार ४०० रुपयांचा दंड आकारला होता. हा दंड कारचालकाने निगडी येथे जमा केला. निगडी येथील भक्तिशक्ती चौकात वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करत असताना कारचालक तिथे आला. त्याने वाहतूक पोलिसांकडे त्याच्या कारवर २७ हजार ४०० रुपयांचा दंड असल्याचे सांगितले. त्यानंतर कारचालकाने ही दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली.
निगडी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर बाबर म्हणाले, ‘निगडी येथील भक्तिशक्ती चौकात वाहतुकीचे नियमन करत असताना खेडकर यांच्या चालकाने निगडी वाहतूक विभागातील एका पोलिस अंमलदाराकडे दंडाची संपूर्ण रक्कम जमा केली आहे.’