पुणे : बालगंधर्व रंगमंदिराने रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे. मात्र, या वास्तूवर हातोडा पडला तर रसिक या वास्तुसाठी रस्त्यावर आडवे होतील का? हे रंगमंदिर रंगकर्मींचे श्रद्धास्थान असले तरी ते वाचविण्याची जबाबदारी केवळ रंगकर्मींचीच आहे का? रसिकांची काही जबाबदारी नाही का? असा खडा सवाल नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी उपस्थित केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीमुळे यंदाचे नाट्य संमेलन लांबणीवर पडणार आहे. सावरकर हे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या ९७ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी नाट्य संमेलनाचा हा उत्सव साजरा केला जातो. परंतु,यंदा संमेलन होण्याची चिन्हे कमी दिसत आहेत. पुढील महिन्यात सावरकर यांची अध्यक्षीय कारकीर्द संपत आहे. सावरकर यांना अनपेक्षितपणे आणखी एक वर्ष मिळाले आहे. नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानातून काढून टाकल्यानंतर अभिनेते अमोल पालकर यांनी सातत्याने कलाकार मंडळीकडूनच विशिष्ठ भूमिका घेण्याच्या अपेक्षा ठेवायच्या का? रसिकांची काही जबाबदारी नाही का? असे खडे बोल रसिकांना सुनावले होते. नाट्यसंमेलनाध्यक्ष सावरकर यांनीही पालेकर यांचीच ‘री’ ओढली. बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाने रंगकर्मींच्या कुटुंबाचे पालनपोषण केले आहे. जर या वास्तूवर हातोडा पडला तर ‘मी निश्चित आडवा होईन आणि पहिला घाव माझ्या देहावर पडेल’असा करारीपणाही दाखविला. बालगंधर्व रंगमंदिर पाडले तर तोपर्यंत रसिकांना मनोरंजनापासून उपाशी ठेवायचे का? ते बंद राहिले तर जेवढी काही नाटकाविषयी आवड, उत्सुकता जिवंत आहे तीच मरून जाईल. मग पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा अध्यक्ष कोण?हे अजून ठरलेले नाही. कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत आलेल्या निमंत्रणापैकी एका निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आला तर कदाचित नाट्य संमेलन डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातही घेतले जाऊ शकते. त्यामुळे सध्या तरी आठ ते दहा महिन्यांचा वाढीव कालावधी मला संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाला आहे, असे मी मानतो. मात्र परिषदेने तसे जाहीर करायला हवे असे सांगून सावरकर म्हणाले, काम करायला वेळ पुरला नाही किंवा मिळाला नाही अशा तक्रारींचा अनुभव मला नाही. मला जे काही करायचे होते त्याला अपेक्षित यश आले नाही इतकेच मी म्हणेन. पण आता जो काही वाढीव कालावधी मिळाला आहे त्यामध्ये मुंबई आणि पुणे वगळता इतर भागातील नाट्य संस्कृती आणि नाट्यचळवळ सशक्त करण्यासाठी नाट्यशिबिरे घेण्याचे ठरवले आहे. नाट्य परिषद शाखा, स्थानिक कलाकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी शिबिर घेण्याची इच्छा आहे. माझ्या अनुभवाचा फायदा व्हावा, अशी इच्छा आहे. या क्षेत्रातील तज्ञ मंडळींना बरोबर घेणार आहे; कारण ग्रामीण भागातील कलाकारांना मोठ्या कलाकारांचे मार्गदर्शन मिळत नाही. ज्येष्ठ कलाकारांसमोर ते किती व्यक्त होतील, अशी शंका असल्याने संवाद घडवण्यासाठी तरुण कलाकारही बरोबर असतील. असा प्रकल्प एकाही संमेलनाध्यक्षाने केलेला नाही. नवीन कार्यकारिणी या आठवड्यात अस्तित्वात आल्यानंतर चर्चा करून पुढची दिशा ठरवणार आहे, असे सावरकर यांनी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिरासाठी रसिक रस्त्यावर आडवे होतील का? ; जयंत सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 7:37 PM
जयंत सावरकर नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
ठळक मुद्दे नाट्य परिषद शाखा, स्थानिक कलाकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी शिबिर