पुणे : नाशिक येथे ऑक्सिजन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेची तपासणी करून याचा सद्यस्थितीतील सुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. सर्व शासकीय रुग्णालये आणि सर्व खाजगी रुग्णालये यांना ऑडिट रिपोर्ट पालिकेला सादर करावा लागणार आहे.
पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यातच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्याही वाढलेली आहे. शहरात व्हेंटिलेटरवर बाराशेपेक्षा अधिक तर ऑक्सिजनवर साडेपाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा नाशिकच्या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. पालिकेने खबरदारी म्हणून ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची व्यवस्था आहे; अशा सर्व रुग्णालयांना तत्काळ त्यांची ऑक्सिजन पुरवठा आणि साठा करण्याच्या यंत्रणेचा सुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय रुग्णालयांची कंत्राटे खासगी ठेकेदारांना दिलेली असल्यामुळे त्याची नैमित्यिक देखभाल दुरुस्ती होत असते. तसेच बायोमेडिकल इंजिनीयरची नेमणूक करण्यात आलेली असते. अशा पद्धतीची व्यवस्था खाजगी रुग्णालयांमध्ये असेलच असे नाही. ऑक्सिजनच्या सुरक्षेचा मुद्दा थेट रुग्णांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्याचाही सूचना देण्यात आल्या आहेत. अशी दुर्घटना घडू नये याकरिता विशेष खबरदारी बाळगण्याचा आणि तज्ज्ञांमार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचनाही महापालिकेकडून सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
------
शहरात पालिकेच्या आणि खासगी अशा १६२ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची सुविधा आहे. त्यातही शहरातील मोडी खासगी रुग्णालये आणि पालिकेचे जम्बो, बाणेर कोविड सेंटर, दळवी रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे खबरदारी बाळगली जात आहे.
-----