लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून अचानक तापमानात वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील पुणे शहरात पडलेल्या पावसाचा आढावा घेता यंदा ऑगस्टमध्ये आतापर्यंतचा सर्वांत कमी पाऊस पडलेला हे दुसरे वर्ष आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर पुणे शहराला पावसाने हुलकावणी दिली. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने मॉन्सूनने जून महिन्याच्या सरासरी ओलांडली होती. जूनअखेर शहरात १५२.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली होती. अर्धा जुलै महिना सरला तरी पावसाचा शहरात पत्ता नव्हता. २० जुलैनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने जुलैअखेरीस शहरात १९३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. २५ ऑगस्टअखेरपर्यंत केवळ ३८.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीपेक्षा ७० मिमीने कमी आहे. ऑगस्ट महिन्यातील उरलेल्या पाच दिवसांत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता दिसून येत नाही.
पुणे शहरात आतापर्यंत ३८३.४ मिमी पाऊस झाला आहे. पुणे शहराची सरासरी ४२३.३ मिमी आहे. तो सरासरीपेक्षा ३९.९ मिमीने कमी आहे. गेल्या १० वर्षांचा ऑगस्ट महिन्यातील आढावा घेतल्यास यापूर्वी २०१५ मध्ये संपूर्ण ऑगस्ट महिन्यात केवळ २४.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. २०१३ मध्ये ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. पुणे शहरात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २००६ साली ३७८ मिमी इतका पाऊस झाला होता.
पाऊस नसल्याने राज्यात सर्वत्र दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. पुणे शहरात बुधवारी कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा २.४ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
या वर्षी पडलेला पाऊस (मिमी)
जूनअखेर २०२१ - १५२.२
जुलैअखेर २०२१ - १९३
२५ ऑगस्टअखेर - ३८.४
पुणे शहरात ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस (मिमी)
२०२० - २५५
२०१९ - २०९
२०१८ - ८७
२०१७ - १६२.२
२०१६ - २३०.५
२०१५ - २४.७
२०१४ - २८०.६
२०१३ -४६.४
२०१२ - २०४.९
२०११ - ११७.४