पुणे : तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसेल, असे सांगितले जात आहे. अशा स्थितीत शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञांचे सशक्तीकरण, प्रशिक्षण केले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये सज्ज करण्यावर भर देण्यात येत आहे. औंध जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केला जात आहे. तसेच, जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील लहान मुलांच्या रुग्णालयांची माहिती मागवली आहे. शासकीय रुग्णालयांतील बालरोगतज्ज्ञांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाणार आहेत.
लहान मुलांना जास्त धोका असला तरी बहुतांश बालकांमध्ये सौम्य लक्षणे आढळतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून बांधण्यात आला आहे. त्यादृष्टीने बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन केले जात आहे. त्यासाठी उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांची रिक्त पदेही भरली जाणार आहेत.
पुणे महापालिकेकडे सध्या ९ बालरोगतज्ज्ञ आहेत. आणखी २९ बालरोगतज्ज्ञ नेमण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
-----------------
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र -९७
उपजिल्हा रुग्णालये -५
जिल्हा रुग्णालये -१
ग्रामीण रुग्णालये १९
-------------------
जिल्ह्यातील एकूण रूग्ण - १००५६४६
बरे झालेले रूग्ण - ९५६८५७
उपचार घेत असलेले रूग्ण - ३२३६६
१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रूग्ण - २०४२५
११ ते १८ वर्षे वयोगटातील रूग्ण - ३४४०४
--------
ग्रामीण भागातील तुलनेत शहरात खाजगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात असतात. शासकीय रुग्णालयांतदेखील पुरेसे बालरोगतज्ज्ञ आहेत. दुर्दैवाने तिसरी लाट आली तर गावांतील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीणमधील सर्व लहान मुलांच्या हॉस्पिटलची माहिती मागवली आहे. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील हॉस्पिटलचे नाव, तेथील डॉक्टरांचे नाव, बेड संख्या, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर संख्या, हॉस्पिटल नोंदणी क्रमांक यासह आवश्यक ती सर्व माहिती भरून देण्याचे त्याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आणि गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.