पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्यावतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत प्राधिकरण जिमखाना, दिवेकर क्रिकेट अकादमी, एसएफएलसीए या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
निगडी येथील मदनलाल धिंगरा मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सलामीच्या लढतीत प्राधिकरण जिमखाना संघाने कॅनन क्रिकेट क्लबचा 6 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अर्णव कानडे १५ (२४) आणि श्रीतरुन पीव्ही १० यांच्या धावांच्या जोरावर प्राधिकरण जिमखाना संघाने १५ षटकात ६ बाद ९६ धावा केल्या. कॅनन क्रिकेट क्लब संघाला १५ षटकात ३ बाद ९० धावाच करता आल्या. यात कृतार्थ मेड नाबाद ३५, वर्धन सकपाळ नाबाद २५ यांचे प्रयत्न अपुरे ठरले. प्राधिकरण जिमखानाकडून वेदांत चौधरीने १२ धावात १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात आर्यन यादव आणि संतोष चौहानच्या फलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा ६९ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत सुहाने काहंदळच्या २३ धावांच्या खेळीच्या जोरावर एसएफएलसीए संघाने परंदवळ स्पोर्ट्स क्लबचा २१ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेत परंदवळ स्पोर्ट्स क्लब, कॅनन क्रिकेट क्लब, प्राधिकरण जिमखाना, एसएफएलसीए, तिकोने क्रिकेट गुरुकुल, दिवेकर क्रिकेट अकादमी या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत ५ साखळी फेरीचे सामने होणार असून अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी स्पर्धेचे उदघाटन क्रीडासभापती उत्तम केंदळे यांच्या हस्ते करण्यात आले.