पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बुधवारी पिंपरीत झालेल्या बैठकीत भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश, शेतकरी आत्महत्या, शिवसेनेची टीका, मध्यावधी निवडणूक, सरकारची धोरणे यावर चर्चा करण्यात आली. ‘मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा, कामाला लागा, अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सुरुवातीला भाजपातील केवळ ६८ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. या वेळी भाजपाच्या ध्येयधोरणावर चर्चा, तसेच पुढील कामकाजाचे नियोजन यावर चर्चा झाली. राज्यातील शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास मध्यावधी निवडणूक लागल्यास भूमिका काय असेल, यावर चर्चा झाली. सत्तेत असूनही शिवसेना भाजपावर टीका करते. त्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. याबाबत आक्रमक भूमिका घ्यायला हवी. विरोधकांना अंगावर येऊ देऊ नका. देशात आणि राज्यात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी करावी. स्वबळावर निवडणूक लढवावी, अशीही चर्चा झाली. त्यावर पक्षातील ज्येष्ठांशी चर्चा केली जाईल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करू, मध्यावधी निवडणूक लागल्यास आपण तयारीत राहायला हवे, असेही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रश्प विचारणाऱ्या सदस्यांना सांगितले. सरकारच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा, अशाही सूचना करण्यात आल्या.
मध्यावधी झाल्यास स्वबळाची तयारी
By admin | Published: April 27, 2017 5:06 AM